रत्ना पाठक: मला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं!

रत्ना पाठक : मला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं!

आईच्या नाटकांपासून सत्यदेव दुबेंच्या तालमींपर्यंतचा रत्ना पाठक यांचा रंगप्रवास

अभिनय म्हणजे पाहणं, ऐकणं आणि सतत शिकत राहणं. नाटकाची सगळ्यात मोठी ताकद कल्पकता आहे.

रत्ना पाठक: मला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं!

चौथ्या जिगीषा नाट्य सहवास-२०२६, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत अभिनेत्री रत्ना पाठक यांनी आपल्या रंगप्रवासातील अनेक अनुभव मोकळेपणाने सांगितले. अभिनय, नाटकाची तालीम, वाचन, निरीक्षण, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आणि सत्यदेव दुबे यांच्याकडून मिळालेली शिकवण याबरोबरच त्यांनी मराठी रंगभूमीच्या काही प्रचलित पद्धतींवरही परखड भाष्य केले.

रत्ना पाठक या त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून नाटकाच्या वातावरणात वाढल्या. नाटक करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला असंच वातावरण मिळायला हवं, त्यामूळं बर्याच समस्या दूर हातील असं त्यांना वाटतं. लहानपणीच नाटकाच्या तालमीपासून प्रयोगापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवायला मिळाल्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सहज आणि परिचित झाल्या.

त्यांच्या आईच्या गुजराती नाटकांच्या तालमी त्या लहानपणापासून पाहत होत्या. मात्र आईच्या तालमींपेक्षा सत्यदेव दुबे यांच्या नाटकांच्या तालमी त्यांना अधिक आकर्षित करत. तालीम कशी होते, पडदा उघडण्यापूर्वी काय घडतं, प्रयोग सुरू झाल्यानंतर रंगमंचामागे काय सुरू असतं आणि पडदा पडेपर्यंतची प्रक्रिया, या सगळ्याशी त्या लहानपणापासून परिचित होत्या.त्यामुळे रंगमंचावर एखादा प्रसंग घडताना इतर प्रेक्षकांना वाटतो तसा ‘वॉव फॅक्टर’ त्यांना कधीच जाणवला नाही. कारण पडदा उघडण्यापूर्वी आणि पडदा पडल्यानंतर नाटक कसं घडतं, याची त्यांना आधीपासूनच ओळख होती.

“मला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं!”

विशेष म्हणजे रत्ना पाठक यांना अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. त्यामागचं एक कारण म्हणजे त्यांना त्यांच्या आईची नाटकं आवडत नसत. त्या काळातील अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांना मर्यादित चौकटीत मांडलं जात असे.एकतर सून छळली जात असे किंवा सासूचा छळ सहन करत असे. अशा प्रकारच्या भूमिका आणि त्या नाटकांची मांडणी रत्ना पाठक यांना आकर्षक वाटत नव्हती.म्हणूनच जेव्हा लोक त्यांना, ‘तुझी आई अभिनेत्री आसल्यामुळे तूही आता अभिनेत्रीच होशील,’ असं म्हणत, तेव्हा त्यांना राग येत असे. त्या मनाशी म्हणत—आपण काहीही होऊ; एअर होस्टेस होऊ, पायलट होऊ; पण अभिनेत्री होणार नाही.पण त्यांनी एका कार्यक्रमात करायचा म्हणून सहज केलेला अभिनयाला प्रोत्साहन मिळालं आणि त्या नाटकात आल्या.

सत्यदेव दुबे यांनी घडवलं

रत्ना पाठक यांच्या कलात्मक घडणीत सत्यदेव दुबे यांचा मोठा वाटा आहे. त्या स्पष्टपणे सांगतात की, “सत्यदेव दुबे यांनी मला घडवलं.”

दुबे यांनी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला (NSD) जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. तरीही रत्ना पाठक NSDमध्ये गेल्या आणि तीन वर्षे तिथे शिकल्या. मात्र NSD मधून परतल्यानंतर सत्यदेव दुबे यांनी त्यांच्या शिकण्याच्या आधीच्या प्रक्रियेची चौकट हळूहळू मोडून काढली.कलाकार म्हणून स्वतःचा शोध घेणं, स्वतःच्या अनुभवातून शिकणं आणि आधी शिकलेल्या गोष्टींकडेही प्रश्नार्थक नजरेने पाहणं, ही प्रक्रिया तिथून सुरू झाली.

अभिनयासाठी पाहणं आणि ऐकणं महत्त्वाचं

रत्ना पाठक यांच्या मते अभिनयासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे ते पाहणं आणि ऐकणं.

मात्र पाहणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत, तिची केसांची रचना कशी आहे किंवा ती बाहेरून कशी दिसते, एवढंच नव्हे. ती व्यक्ती आतून कशी आहे, तिच्या वागण्यामागची मानसिकता काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे खरं पाहणं.

त्याचप्रमाणे ऐकणं म्हणजे केवळ समोरच्या व्यक्तीचे शब्द ऐकणं नव्हे. त्या शब्दांमागे बोलणाऱ्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय आहे, ती नेमकं काय सांगू पाहते आहे, हे समजून घेणं म्हणजे ऐकणं.

अभिनेत्याने माणसांकडे अशा संवेदनशीलतेने पाहिलं आणि ऐकलं, तरच त्याला व्यक्तिरेखा अधिक खोलवर समजून घेता येते, असं त्यांच्या विचारांतून जाणवतं.

वाचनातून व्यापक होत जाणारी दृष्टी

याच संदर्भात त्या वाचनाचं महत्त्वही अधोरेखित करतात. वाचन खूप महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी केलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे.कलाकारासाठी वाचन म्हणजे केवळ माहिती मिळवण्याचं साधन नाही. वाचनामुळे जगाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते, माणसांना समजून घेण्याची क्षमता वाढते आणि व्यक्तिरेखांकडे पाहण्याचे नवे संदर्भ मिळतात.

चार्ली चॅप्लिनच्या विनोदामागचा अर्थ

अभिनयाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चार्ली चॅप्लिनच्या उदाहरणातूनही स्पष्ट होते. चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पाहिल्यास त्यांच्या प्रत्येक दृश्यामध्ये एक प्रकारची ‘विटीनेस’ जाणवते, असं त्या सांगतात.

चॅप्लिन केवळ प्रेक्षकांना हसवत नाहीत. त्यांच्या विनोदामागे काहीतरी भाष्य, आशय किंवा मतितार्थ असतो. त्यामुळे विनोद हा केवळ मनोरंजनासाठी नसतो; त्यातूनही एखादी गोष्ट सांगता येते, हे चॅप्लिनच्या कामातून दिसून येते.त्यांचे चित्रपट सर्वांनी पाहण्याचा त्या आग्रह करतात.

मराठी रंगभूमीला त्यांचा सल्ला

मराठी रंगभूमीबद्दल बोलताना रत्ना पाठक यांनी रंगमंचावरील वास्तववादाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला.

आजही काही नाटकांमध्ये घराचे सेट हलवले जातात आणि रंगमंचावर काहीतरी घडत असल्याचा आभास निर्माण केला जातो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपली घरं अशी हलतात का? नाही. मग रंगमंचावरही अशा कृत्रिम हालचाली करण्याची गरज काय, असा त्यांचा सवाल आहे.

त्यांच्या या प्रश्नामागे केवळ एखाद्या तांत्रिक पद्धतीवर टीका नाही, तर रंगभूमीने वास्तवाकडे अधिक प्रामाणिकपणे पाहावं, अशी त्यांची अपेक्षा दिसते.

शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही

रत्ना पाठक यांच्या विचारांमधून कलाकाराच्या शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही, हे स्पष्ट होतं. कलाकार होणं म्हणजे केवळ अभिनय शिकणं नव्हे. माणसांकडे पाहणं, त्यांचं बोलणं ऐकणं, वाचन करणं, प्रश्न विचारणं आणि स्वतःच्या शिकलेल्या चौकटी मोडून नव्याने शिकत राहणं, ही कलाकार घडण्याची सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे.

दिग्दर्शनाबाबतही त्या स्वतःची मर्यादा मान्य करतात. आपल्याला दिग्दर्शन अजून जमत नाही, असं त्या सांगतात; मात्र ते शिकायचं आणि दिग्दर्शन करायचंच, हा त्यांचा निर्धारही त्या व्यक्त करतात. कलाकार म्हणून शिकण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्याची त्यांची तयारी यातून दिसून येते.

ज्या मुलीला लहानपणी अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, जिच्या मनात रंगमंचाबद्दल कोणताही ‘वॉव फॅक्टर’ नव्हता, आणि जिने अभिनेत्री होण्याची कल्पनाच नाकारली होती, तीच पुढे भारतीय रंगभूमीवरील महत्त्वाची अभिनेत्री बनली—हा रत्ना पाठक यांच्या रंगप्रवासातील कदाचित सर्वांत सुंदर विरोधाभास आहे.

जिगीषा नाट्य महोत्सवातील या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रदीर्घ रंगप्रवासातील अनुभव केवळ आठवणी म्हणून सांगितले नाहीत; तर कलाकाराने जगाकडे कसं पाहावं, कसं ऐकावं आणि सतत शिकत कसं राहावं, याबद्दलची आपली भूमिका अत्यंत मोकळेपणाने मांडली.त्यांच्या अभिनयाइतकाच समृद्ध आणि विचारशील असा त्यांचा रंगभूमीविषयक दृष्टिकोनही या संवादातून समोर आला.

अजूनही त्यांचे अनेक पैलू उलगडता आले असते, परंतु मुलाखत घेणारे दिग्गज यांची अपूर्ण तयारी दिसली.रत्ना पाठक बोलत असताना ते एकमेकांना बोलत होती.त्यामुळे रत्ना पाठक आणि रसिकांचे लक्ष विचलीत होत होतं.कदाचित सर्व व्याप त्यांच्याच मागे असल्यामुळे तसे झाले असावे.त्या अपूर्या तयारीचा उल्लेख नाटककार प्रा.अजित दळवी यांनी त्यांच्या स्वता:च्या मुलाखतीत टोमणा मारला. रसिकांना मात्रा रत्ना पाठक यांच्याशी संवाद साधता आला नाही.बाकी मुलाखत छानच होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top