मस्त महिला मंडली : आम्हीच आमचा पिक्चर करायचं ठरवलं

मस्त महिला मंडली : आम्हीच आमचा पिक्चर करायचं ठरवलं..‍.‍!

Mast Mahila Mandali 
मस्त महिला मंडली हा लघूपट पाहात आसताना…


स्वतःच, स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःला प्रकट करणारी गोष्ट म्हणजे ‘मस्त महिला मंडली’.

कोरो या संस्थेशी जोडलेल्या दहा महिलांचा हा ७२ मिनिटांचा माहितीपट. मुंबईतील झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या, पण तरीही दिलखुलासपणे जगणाऱ्या या महिलांची ही गोष्ट आहे.

झोपडपट्टी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर दुःख, दारिद्र्य आणि कचरा उभा राहतो. पण त्या महिला सांगतात—झोपडपट्टीत फक्त कचरा नसतो, आम्हीही असतो… फक्त दुःख नसतं, सुखही असतंच… आमच्या आयुष्यात फक्त रडणं नाही, तर आनंदाने जगणंही आहे.आणि नेमकं हेच जगणं त्यांना सांगायचं होतं आणि ते सांगण्यासाठी त्यांनी फिल्म हे माध्यम निवडलं. स्वताची फिल्म स्वताच बनवायची तिही स्मार्टफोनवरती…

त्यांचा विचार अगदी स्पष्ट होता.आमच्यावर दुसऱ्यांनी फिल्म करून, त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मांडण्यापेक्षा आम्हीच आमचा पिक्चर करायचा.इथून सुरू होतो ‘मस्त महिला मंडली’ या माहितीपटाचा रंजक प्रवास.स्मार्टफोन कसा धरायचा, कॅमेरा कसा सुरू करायचा, शॉट कसा घ्यायचा, काय चित्रित करायचं, त्यातून कथा कशी सांगायची, आणि शेवटी त्या सगळ्याचं संकलन कसं करायचं—फिल्म मेकिंगची ही संपूर्ण प्रक्रिया त्यांनी स्वतः अनुभवली आणि पार पाडली आहे.म्हणूनच हा केवळ दहा महिलांच्या आयुष्यावरचा माहितीपट राहत नाही; तर तो महिलांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी फिल्म हे माध्यम शिकून घेतल्याचा प्रवासही बनतो.

या माहितीपटाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्त्री-केंद्रित मांडणी. येथे एकाही महिलेचा नवरा दाखवलेला नाही. त्यांची मुलं नाहीत, नातेवाईक नाहीत. त्यांच्या आयुष्याची ओळख करून देताना पुरुष किंवा कुटुंबीयांच्या संदर्भाची गरज भासू नये, अशी ही मांडणी आहे. त्या स्वतः आहेत, त्यांचं जगणं आहे, त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांचा दृष्टिकोन आहे आणि या माहितीपटाची हीच मोठी ताकद आहे.आपल्याबद्दलची कथा आपणच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘मस्त महिला मंडली’चा संदर्भ ‘Writing with Fire’ सारख्या माहितीपटांच्या पुढच्या टप्प्याशी जोडून पाहता येतो. मात्र इथे पत्रकारिता किंवा माध्यम संस्थेच्या चौकटीपेक्षा स्वतःच्या जगण्याकडे स्वतःच्या कॅमेऱ्यातून पाहण्याचा अनुभव अधिक महत्त्वाचा ठरतो.

या माहितीपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती पद्धत. महागडे कॅमेरे, मोठं तांत्रिक पथक किंवा मोठा निर्मिती खर्च यापैकी काहीही आवश्यक ठरलेलं नाही. स्मार्टफोनवर चित्रीकरण, स्वतःचं संकलन आणि इतर तांत्रिक जबाबदाऱ्याही त्यांनीच पार पाडल्या आहेत.त्यामुळे हा माहितीपट एक महत्त्वाचा प्रश्नही विचारतो—चित्रपट बनवण्यासाठी मोठ्या डोलाऱ्याची गरज असते की आपली गोष्ट सांगण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा पक्का निर्धार पुरेसा असतो?

‘मस्त महिला मंडली’चं उत्तर स्पष्ट आहे—गोष्ट सांगण्याची इच्छा आणि ती स्वतः सांगण्याचा अधिकार महत्त्वाचा.

AIFF च्या Round The Year कार्यक्रमाअंतर्गत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात MGM येथे या माहितीपटाचं प्रदर्शन झालं. त्यानंतर आयोजकांनी हा माहितीपट २० ते २४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या Ajanta–Ellora International Film Festival- २०२७ , छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर दाखवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

स्वतःच्या जगण्याची गोष्ट स्वतःच्या कॅमेऱ्यातून सांगणाऱ्या या महिलांसाठी हा निश्चितच आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे.कारण त्यांनी केवळ फिल्म बनवली नाही. त्यांनी स्वतःची गोष्ट स्वतः सांगण्यासाठी कॅमेरा हातात घेतला…

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top