Table of Contents
Toggleतुम्ही दाभोलकरांचे रक्त सांडवा, आम्ही रक्तदान करू!
Udaypeeth Digital Media
तुम्ही दाभोलकरांचे रक्त सांडवा, आम्ही रक्तदान करू!
नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त घाटीत रक्तदान शिबिर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तपेढीतील कर्मचारी आणि डॉक्टरांना अं.नि.स.च्या वार्तापत्राची मासिकेही वाटप करण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. यापुढे दरवर्षी २० ऑगष्ट रोजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळांमध्ये जाऊन विविध उपक्रम राबविण्याचा संकल्पही समितीने व्यक्त केला.विशेषतः झी-अल्फा पिढीतील मुलांमध्ये नरेंद्र दाभोलकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. संध्या करमनकर, अशोक पवार, शंकर थळकर, गणेश पाटील, आयूब खान, दांडगे, सतीश धुताडमल आणि जगदीश परदेशी यांनी रक्तदान केले. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम किनाळकर, वेंकट भोसले व महादेव डांबरे यांची महत्वपूर्ण उपस्थिती होती.
“हिंसेला उत्तर रक्तदानाने देणार”

“हिंसेला उत्तर रक्तदानाने देणार”
जगदीश परदेशी, कार्यकर्ता- अं.नि.स:
“हिंसेला उत्तर रक्तदानाने देणार”, २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली.त्यांच्या हत्येमागे विज्ञानवादी आणि विवेकवादी विचार संपविण्याचा हिंसक प्रयत्न होता.दाभोळकर शरीराने आपल्यातून गेले; मात्र त्यांचे विचार आजही जिवंत आहेत.
त्यांचे रक्त सांडले गेले; त्याला हिंसेने उत्तर न देता रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणे, हाच त्यांच्या विचारांना खरा अभिवादन करण्याचा मार्ग आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो— “तुम्ही दाभोलकरांचे रक्त सांडवा, आम्ही रक्तदान करू!”
एका दाभोलकरांची हत्या करून विचार संपविता येत नाहीत.उलट त्यांच्या विचारांतून शेकडो दाभोलकर निर्माण झाले आणि आजही होत आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि संविधानिक मूल्यांसाठीची ही लढाई हिंसेची नसून अहिंसेची आहे.कारण आम्ही सगळे दाभोलकर आहोत.
न्यायालयीन प्रक्रियेतील अलीकडच्या घडामोडींमुळे दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाकडे पुन्हा एकदा समाजाचे लक्ष वेधले गेले आहे.न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखत आम्ही एवढेच सांगू इच्छितो की, आरोपी सुटला तरी विचारांची हत्या होणार नाही.
एक दाभोलकर मारला, तरी शेकडो दाभोलकर उभे राहतील.



